खवय्यांना मोठा झटका! वडापावपासून थाळीपर्यंत दरवाढीचा तडाखा; बाहेरचं जेवण महागणार, नवे दर काय असणार?

पुणे : देशातील हॉटेल-रेस्टॉरंट उद्योग सध्या गंभीर आर्थिक ताणातून जात असून वाढते खर्च आणि सरकारी शुल्कांमुळे व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ, इंधन दरवाढ आणि विजेचे वाढलेले दर यामुळे ऑपरेशनल खर्च तब्बल २५ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.

उद्योगातील प्रतिनिधींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. करांमध्ये सवलत, तसेच गॅस आणि वीज दरांमध्ये दिलासा न दिल्यास ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, सध्याच्या परिस्थितीत तोटा सहन करून व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.
उद्योगातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व विजय शेट्टी यांनी प्रशासकीय दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक हॉटेल्सनी खर्च कमी करण्यासाठी पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शनसाठी अर्ज करून डिपॉझिट भरले असतानाही अजूनपर्यंत कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे व्यावसायिकांना अजूनही महागड्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे.

याशिवाय कमर्शियल गॅस सिलेंडरवरील कर आणि सेवा शुल्कांमध्ये झालेली वाढही व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कच्च्या मालामध्ये खाद्यतेल, डाळी, पालेभाज्या यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर कुशल कामगारांचा तुटवडा आणि विविध परवान्यांच्या शुल्कात वाढ यामुळे उद्योगावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

या सर्व परिस्थितीचा परिणाम लवकरच ग्राहकांवर दिसून येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, थाळी, स्नॅक्स आणि इतर पदार्थांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बाहेर जेवण्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.