तलाठी भरती 1700 पदांसाठी ‘मेगा संधी’! MPSCकडून मोठी जाहिरात लवकरच, लाखो तरुणांच्या आशा पुन्हा उंचावल्या!

राज्यातील हजारो तरुणांसाठी मोठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदांसाठी तब्बल 1700 हून अधिक रिक्त जागांची भरती प्रक्रिया आता वेग घेणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबवली जाणार असल्याने उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्य शासनाच्या प्रशासनात सुमारे 33 विभाग, 110 आस्थापना आणि 3,600 हून अधिक संवर्ग कार्यरत आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसाठी तब्बल 1,400 पेक्षा अधिक सेवा प्रवेश नियम असल्यामुळे विविध विभाग स्वतंत्रपणे परीक्षा घेत होते. खासगी कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांवर अनेकदा गैरप्रकारांचे आरोपही झाले होते. त्यामुळे पारदर्शकता वाढवण्यासाठी सरळसेवा भरती एमपीएससीकडे देण्याचा निर्णय शासनाने काही वर्षांपूर्वी घेतला होता.
याच निर्णयाचा भाग म्हणून आता तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून होणार आहे. महसूल विभागाने राज्यातील रिक्त पदांचा जिल्हानिहाय अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीपत्र मागवण्यात आले असून, 8 मे 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णयानुसार, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरली जाणार आहेत. पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रानुसार स्वतंत्र मागणीपत्र तयार करून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर एमपीएससीकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असून, जुलै महिन्यापर्यंत भरतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या तलाठी भरतीस तब्बल 11 लाखांहून अधिक अर्ज आले होते. 4,466 जागांसाठी 10 लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे यंदाच्या 1700 पदांसाठीही मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
या मेगाभरतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठी संधी मिळणार असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तलाठी भरती मार्गी लागत असल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.