बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला! अवघ्या 4 दिवसांत सुमारे 2 लाख कोंबड्या नष्ट, लाखो अंडीही जमीनदोस्त; धक्कादायक आकडा समोर आला

नंदूरबार : राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनेक पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.

संक्रमण रोखण्यासाठी बाधित पोल्ट्री फार्ममधील सर्व कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच अंडी आणि पशुखाद्यही सुरक्षितपणे नष्ट केले जात आहे. नागरिकांनी चिकन आणि अंड्यांचे सेवन टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत नवापूर परिसरातील 8 पोल्ट्री फार्ममधील तब्बल 1 लाख 93 हजार 667 पक्ष्यांचे किलिंग करण्यात आले आहे. यासोबतच 8 लाखांहून अधिक अंडी आणि सुमारे 21.22 मेट्रिक टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी दिली आहे.

प्रशासनाची मोठी कारवाई
बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिसरात 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. सुमारे 150 कर्मचाऱ्यांची 25 पथके या मोहिमेसाठी तैनात करण्यात आली आहेत.

तीन पोल्ट्री फार्मचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी बाधित भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
संसर्ग वाढू नये यासाठी सर्व पोल्ट्री फार्म चालक आणि कुक्कुटपालकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्ष्यांचा अचानक मृत्यू, सुस्ती, अन्न-पाण्याचे प्रमाण कमी होणे किंवा अंडी उत्पादनात घट दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नंदुरबारमधील या प्रादुर्भावामुळे नाशिक आणि मालेगाव परिसरातही सतर्कता वाढवण्यात आली असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.