लग्न पार पडलं, पाठवणीची वेळ आली… आणि २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचं खरं रूप समोर!

बिहार : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच अजब घटना समोर आली असून, एका लग्नसोहळ्यात थेट ‘डुप्लिकेट’ नवरदेव बसवून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, ही फसवणूक एका साध्या २०० रुपयांच्या नोटेमुळे उघडकीस आली आणि वरातीला नवरीविनाच परतावे लागले.

ही घटना बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. मनियारी परिसरातून मोठ्या थाटामाटात वरात आली होती. ढोल-ताशे, गाणी आणि नाचाच्या जल्लोषात रात्री उशिरापर्यंत लग्नाचे सर्व विधी पार पडले. उपस्थित नातेवाईक आणि गावकऱ्यांनाही कोणतीच शंका आली नाही. मांडवात बसलेला नवरदेव खरा नसून दुसराच आहे, हे कुणाच्याही लक्षात आले नाही.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवणीच्या वेळी एक अनपेक्षित वळण आले. नवरदेवाच्या वागणुकीवर एका महिलेला संशय आला. तिने नवरदेवाची थोडी ‘परीक्षा’ घेण्याचा निर्णय घेतला. तिने त्याच्या हातात २०० रुपयांची नोट देत, “ही किती रुपयांची आहे?” असा साधा प्रश्न विचारला. नवरदेवाने नोट नीट पाहिलीही नाही आणि ती २००० रुपयांची असल्याचे उत्तर दिले. या चुकीमुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

यानंतर नवरदेवाची नीट चौकशी करण्यात आली असता, धक्कादायक सत्य समोर आले—मुलीशी ज्याचा साखरपुडा झाला होता, तो मुलगा वेगळाच असून लग्नासाठी दुसऱ्यालाच बसवण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच नवरीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आणि पाठवणी थांबवण्यात आली.

फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच नवरीने ठाम भूमिका घेत, या नवरदेवासोबत सासरी जाण्यास नकार दिला. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांना बोलावण्यात आले. बरियारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
अखेर, वरातीला अपमानास्पद परिस्थितीत नवरीशिवाय परतावे लागले. पोलिसांनी या प्रकरणात नवरदेवाच्या बाजूने असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून, या फसवणुकीमागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण, याचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, लग्नासारख्या पवित्र समारंभात झालेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.