जिगरी दोस्तांनीच घेतला जीव! बायकोशी संबंधांसाठी पार्टीत नेऊन मित्राचा विटांनी ठेचून खून

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील मितली गावात एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. ज्या मित्रांवर जीवापाड विश्वास ठेवला, त्याच मित्रांनी पाठीत खंजीर खुपसत एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. 2 मे रोजी सकाळी गावातील ट्यूबवेलजवळ मूळचंद उर्फ सोनू या फास्ट फूड विक्रेत्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता.

मूळचंद हा गावात छोटंसं फास्ट फूडचं दुकान चालवत होता. विशाल, दीपक आणि रिंकू हे त्याचे जिगरी दोस्त मानले जात होते. पण या मैत्रीच्या आड एक काळा खेळ सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांचेही मूळचंदच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. मूळचंद हा त्यांच्या या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्याला कायमचा मार्गातून हटवायचा कट त्यांनी रचला.
घटनेच्या दिवशी तिघांनी मूळचंदला “पार्टी करूया” असं सांगत गावाबाहेरच्या ट्यूबवेलवर बोलावलं. तिथं सगळ्यांनी मिळून दारू-बिअर पित तासनतास मौजमजा केली. मूळचंद पूर्णपणे नशेत गेला आणि स्वतःचा बचाव करायच्या अवस्थेत राहिला नाही, तेव्हा तिघांनी जवळच पडलेल्या विटांनी त्याच्या डोक्यावर सपासप वार करत निर्दयीपणे त्याची हत्या केली. डोकं ठेचल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार झाले, पण घटनास्थळी पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि रक्ताळलेल्या विटांनी सगळा प्रकार उघड केला. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स तपासत संशयावरून तिघांना ताब्यात घेतलं. चौकशीत पोलिसी धाक दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणामुळे गावात एकच खळबळ उडाली असून “मित्रच असा विश्वासघात करतील?” असा संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवलं असून पुढील तपास सुरू आहे.