वेळेत येणार मान्सून! भारतीय हवामान विभाग कडून गुड न्यूज; पावसाची तारीख ठरली


पुणे : भारतीय हवामान विभाग कडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून वेळेत दाखल होणार असून जूनच्या सुरुवातीलाच पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून शेतीसाठीही ही माहिती महत्त्वाची मानली जाते.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मान्सून सुमारे १ जूनच्या दरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचेल. दरवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाचे आगमन ठरलेल्या वेळेत होणार असले, तरी देशभरातील पावसाचे प्रमाण सरासरीच्या ९२ ते ९५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पाऊस किंचित कमी राहू शकतो आणि पाणी व्यवस्थापनावर भर देण्याची गरज भासू शकते.

दरम्यान, पॅसिफिक महासागरातील एल निनो चा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, पावसाची वेळेवर सुरुवात होणे जलसाठे आणि पिण्याच्या पाण्यासाठी सकारात्मक ठरणार आहे.

सामान्यतः केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सुमारे १० दिवसांनी तो महाराष्ट्रात पोहोचतो. यानुसार १० ते १२ जूनदरम्यान कोकण आणि मुंबईत पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १५ जूनपर्यंत पुणे व मध्य महाराष्ट्रात, तर २० जूनपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

सध्या मे महिन्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत असली, तरी मुख्य मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्यांची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाई न करण्याचा सल्ला दिला असून, किमान ८० ते १०० मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी टाळण्याचे आवाहन केले आहे. योग्य प्रमाणात जमिनीत ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी केल्यास नुकसान टाळता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!