कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू; पायधूनी प्रकरणात गूढ अधिकच वाढलं, डॉक्टरांची धक्कादायक माहिती


मुंबई : पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात या मृत्यूमागे विषारी किंवा रासायनिक पदार्थाचा संबंध असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ही घटना साध्या अन्न विषबाधेची नसल्याचं स्पष्ट होत आहे. डॉक्टरांच्या मते, चौघांची प्रकृती अन्नातून होणाऱ्या विषबाधेपेक्षा अधिक गंभीर होती.

दरम्यान, मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी याबाबत रुग्णालय प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

घटनेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या झपाट्याने प्रकृती खालावत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. सुरुवातीला कुटुंबीयांना उलट्या सुरू झाल्या, त्यानंतर त्यांच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत बिघाड झाला, शुद्ध हरपली आणि काही तासांतच चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण अधिक गूढ बनलं आहे.

सध्या पोलिस न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपास अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. त्याचवेळी अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून एकूण ११ नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि विविध मसाल्यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!