नागपुरात खळबळ! गडकरींना सोशल मीडियावरून धमकी; व्हिडिओत आक्षेपार्ह वक्तव्य

नागपूर : नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सुमितकुमार राकेशकुमार चौहान (वय 41, नांगलोई, दिल्ली) हे व्यावसायिक असून अखिल भारतीय हिंदू महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी नागपुरात असताना चौहान यांनी फेसबुकवरील ‘सनातनी शेर’ या आयडीवर एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत गंभीर धमक्या दिल्याचे दिसून आले. तसेच खोटे आरोप करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

याशिवाय दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये धार्मिक भावना भडकावणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे विधान करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपीचे नाव आयुष रमेशचंद्र अग्रवाल (वय 44, मानेवाडा चौक, नागपूर) असल्याचे निष्पन्न झाले. त्याने नागपुरातूनच हे व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.