रस्त्यावरून जात असताना चालू वादात मध्यस्थी करण अंगलट ;इनोव्हा गाडीवर स्थानिक लोकांचा हल्ला ; दौंड तालुक्यातील घटना…


यवत : बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत चालत्या एका ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोपोडी (ता. दौंड) येथील गरदडेवस्ती हद्दीत न्हावरा ते चौफुला रोडवर गुरुवारी (ता. 02) हि घटना घडली.

याप्रकरणी शिवाजी मुरलीधर महाडीक (वय-37, रा. शिंदवणे, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी सुभाष बाबा गरदडे, मंदा सुभाष गरदडे, स्वप्नील सुभाष गरदडे, तुषार थोरात, प्रशांत थोरात, सर्जेराव बाळू गरदडे, निलेश आप्पा गरदडे, उत्कर्षा निलेश गरदडे आणि बबन सर्जेराव गरदडे (सर्व रा. खोपोडी, गरदडेवस्ती, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी महाडीक हे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या टोयोटा कंपनीच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीने (क्र. MH 12 YR 7171) न्हावरा-चौफुला रोडवरून जात होते. यावेळी खोपोडी गावच्या हद्दीत गरदडे वस्तीजवळ वरील सर्वांचा जुन्या भांडणातून वाद सुरु होता.

यावेळी शिवाजी महाडिक हे न्हावरा-चौफुला रोडवरून निघाले असता काहीही कारण नसताना आरोपींपैकी एकाने शिवाजी महाडीक यांच्या चारचाकीच्या दिशेने दगड भिरकावला. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. तसेच जाब विचारला असता लाकडी काठ्या घेऊन फिर्यादींच्या गाडीवर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी गाडीवर दगड भिरकावून मारल्याने गाडीचे पुढील बंपर, पुढील शो,दोन्ही बाजूचे दरवाजे आणि इतर भागांचे मोठे नुकसान झाले आहे. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, फिर्यादी शिवाजी महाडीक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार विविध कलमान्वये वरील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार प्रशांत म्हस्के करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!