खेळत बाहेर पडली अन् परतलीच नाही; उघड्या टाकीत पडून चिमुकलीचा मृत्यू, पुण्यातील तिघांना अटक…

पुणे : पुण्यातील जुनी सांगवी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पवनानगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ खेळत गेलेल्या चिमुकलीसोबत दुर्दैवी प्रकार घडला.

इमारतीतील उघड्या टाकीत पडून अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तीन जणांना अटक केली आहे. मंगळवारी (३१ मार्च) रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर बांधकाम ठिकाणांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रियंका मनोज विश्वकर्मा (वय ३ वर्षे ९ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
प्रियंका घराबाहेर खेळत असताना जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या परिसरात गेली.त्या ठिकाणी पाण्याची टाकी उघडी अवस्थेत होती. टाकीवर कोणतेही झाकण किंवा सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
खेळता खेळता प्रियंका त्या टाकीत पडली आणि दुर्दैवाने बुडून तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी प्रियंकाचे वडील मनोज उज्जैन विश्वकर्मा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनीष बाबासाहेब पवार, जयराम बबनराव कांबळे आणि वसंत कैलास बनसोडे या तिघांना अटक केली आहे.
या कारवाईमुळे निष्काळजीपणामुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत जबाबदारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.