महाराष्ट्रात वार फिरलं!येत्या 24 तासांत काळे ढग, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे : राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हवामानात झालेल्या बदलाने सर्वांनाच हैराण केलं आहे. महाराष्ट्रातील विविध भागात अस्मानी संकट घोंगावत आहे. आता मार्चअखेर धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.महाराष्ट्रात आज कोरडे ते अंशत: ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यांची शक्यता आहे.
आज राज्यात कमाल तापमान 31 ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 28 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर, तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान हवामानाच्या बदलत्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना पुढील चार दिवस विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 30 मार्चपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सक्रीय होत असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
सोमवारपासून अवकाळीचा धोका वाढण्याचा अंदाज आहे. बहुतांश भागांना वाऱ्यांसह अस्मानी संकट झोडपून काढणार आहे.