शेतकऱ्यांची चिंता वाढली!आखाती युद्धाच्या फटक्याने खतांची टंचाई भासणार? महत्वाची अपडेट आली समोर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाचा फटका आता भारताच्या खत क्षेत्रावरही दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढू लागली आहे. या आखाती युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे देशातील युरिया आणि मिश्र खतांच्या उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या देशात सुमारे तीन महिन्यांचा खत साठा उपलब्ध असून, पर्यायी देशांकडून आयात वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भारताचा खत उद्योग मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. देशातील सुमारे 20 टक्के युरिया आणि जवळपास एकतृतीयांश मिश्र खतांची गरज आयातीतून भागवली जाते.मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे कच्च्या मालाच्या तसेच आयातीतून येणाऱ्या खतांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
‘क्रिसिल रेटिंग्स’च्या अहवालांतून खताबाबत आलेली माहिती अशी की,एलएनजी आणि अमोनिया या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. हा अडथळा पुढील तीन महिने कायम राहिल्यास देशांतर्गत खत उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.या परिस्थितीमुळे उत्पादन घटण्याबरोबरच खत उद्योगाच्या आर्थिक घटकावर ही ताण येणार आहे.

या परिस्थितीचा परिणाम सरकारवरही पडणार आहे. खत अनुदानाचा खर्च सुमारे 20000ते 25000 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उद्योगाला आता,तातडीने मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.