शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट, वाचा महत्वाची माहिती..


पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून अनेक ठिकाणी गारपीठ देखील होत आहे. आता आज राज्याच्या वातावरणात बरेच बदल अनुभवायला मिळतील. नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार वृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच सोमवारपासून या पावसाचा जोर अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. याउलट, कोकण पट्ट्यात मात्र आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून, दुपारी बारा ते चार या वेळेत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा भागातील वातावरणात विलक्षण बदल पाहायला मिळत आहेत.

कडाक्याचे ऊन, तर दुसरीकडे अवकाळी पावसाची संततधार अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिना संपत आला तरी पावसाचा जोर कायम असल्याने रब्बी हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू असली, तरी भारतीय हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामानातील या सततच्या चढउतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, शेती कामांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच सलग पाच दिवस उघडीप दिल्यानंतर चांदवड आणि लगतच्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अवकाळीने झोडपले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह तब्बल एक तास झालेल्या या पावसामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे.

काढणीला आलेला गहू, हरभरा आणि सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवलेला कांदा या अस्मानी संकटामुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सोमवारपासून या पावसाचा जोर अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!