गॅस जरा जपून वापरा! बुकिंगचा नियम पुन्हा एकदा बदलला, आता ३५ दिवस..! टंचाईमुळे सर्वसामान्यांचे टेन्शन वाढलं

पुणे : इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भारतातही त्याचे परिणाम स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. देशातील काही भागांत इंधन पुरवठा विस्कळीत होत असून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती आहे. अनेक शहरांमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी लोकांना तासन्तास प्रतीक्षा करून सिलिंडर घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

या वाढत्या मागणी आणि मर्यादित पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर गॅस कंपन्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आले असून, वारंवार बुकिंग करण्यावर काही प्रमाणात निर्बंध आणले गेले आहेत.
त्यामुळे ग्राहकांना आता सिलिंडर मिळवण्यासाठी अधिक काळ थांबावे लागू शकते. तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कंपन्यांनी आता सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमांनुसार, ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार नाही. विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आलं आहे.
ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे, त्यांना आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सिंगल सिलिंडर कनेक्शन म्हणजे ज्याच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा नियम अधिक कडक केले आहेत.