दौंडमध्ये अवकाळी पावसाचा बळीराजाला फटका; आमदार राहुल कुल यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.दौंड तालुक्यात 18 व 19 मार्च रोजी झालेल्या अचानक अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार राहुल कुल यांनी महसूल आणि कृषी विभागाला तातडीने घटनास्थळी जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासूनच प्रशासकीय यंत्रणा शेताच्या बांधावर उतरणार आहे.

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचा आणि गारांचा जोर सर्वाधिक होता. यामध्ये प्रामुख्याने यवत, यवत स्टेशन, उंडवडी, खामगाव, खानोटे, पिलानवाडी, दहीटने आणि राहू या गावांचा समावेश आहे. या भागात कांदा, भाजीपाला, फळबागा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे या आपत्तीमुळे कंबरडे मोडले आहे. यावर भाष्य करताना आमदार राहुल कुल म्हणाले की, “बळीराजावर आलेले हे संकट मोठे आहे. मी संबंधित महसूल विभाग आणि कृषी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर तयार करून तो शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधितांना शासनाकडून योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार कुल यांनी स्पष्ट केले”

प्रशासनाने आजपासूनच कामाला सुरुवात करावी, अशा कडक सूचना असल्याने आता महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष बाधितांच्या शेतात जाऊन पाहणी करणार आहेत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.