हिंजवडीतील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सरकारचं पाऊल! पुरंदर आयटी पार्कबद्दल मोठी माहिती आली समोर…

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. हेच स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. हिंजवडीला पर्याय म्हणून पुरंदर येथे भव्य आयटी पार्क उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

पुरंदर तालुक्यात सुमारे ५७२ हेक्टर (जवळपास दीड हजार एकर) क्षेत्रावर अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही माहिती दिली. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. पुणे हे देशातील आघाडीचे आयटी केंद्र म्हणून ओळखले जाते.
मात्र गेल्या काही वर्षांत आयटी उद्योगाचा वेगाने विस्तार झाल्यामुळे हिंजवडीसह विद्यमान आयटी पार्कवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांवरील दबाव आणि जागेची कमतरता यामुळे काही आयटी कंपन्या इतर राज्यांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात नवे आयटी हब उभारण्याची गरज निर्माण झाली होती.

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील आयटी क्षेत्राच्या समस्या आणि कंपन्यांचे स्थलांतर रोखण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांबाबत त्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुण्यातील आयटी उद्योगाचा विस्तार व्हावा आणि नवीन आयटी केंद्रे विकसित व्हावीत, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. त्या पार्श्वभूमीवर पुरंदरमध्ये आयटी पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला अधिक गती मिळाल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या परिसरात असलेली सुमारे १५०० एकर सरकारी जमीन या प्रकल्पासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. महसूल विभागाकडून ही जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यक प्रशासकीय मंजुरीनंतर प्रकल्पाला वेग देण्यात येणार आहे.
या आयटी पार्कचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेले स्थान. विमानतळ, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधांमुळे हा परिसर आयटी कंपन्यांसाठी आकर्षक ठरणार आहे. भविष्यात हा भाग आयटी उद्योग, सेवा क्षेत्र आणि स्टार्टअप्ससाठी एक महत्त्वाचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची तसेच हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच पुरंदर आणि परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जमीन हस्तांतरण, पायाभूत सुविधा उभारणी आणि उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रक्रिया सुरू असून मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासासाठी पुरंदरमधील प्रस्तावित आयटी पार्क हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.