वर्ल्डकप जिंकताच टीम इंडिया मालामाल, संघावर ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; न्यूझीलंडला किती रुपये मिळाले?

नवी दिल्ली : आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून भारताने इतिहास रचला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला.

महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली असून तो पहिल्यांदाच घरच्या मैदानावर विश्वविजेता बनला आहे. या स्पर्धेत मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात आर्थिक बक्षीसही मिळाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या स्पर्धेसाठी एकूण 13.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 120 कोटी रुपयांचा प्राईज पूल जाहीर केला होता. हा निधी मागील आवृत्तीपेक्षा सुमारे 20 टक्क्यांनी अधिक होता.

विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाला 3 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 27.5 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे जमा होणार असून त्यानंतर ती खेळाडूंमध्ये बोनस, सामन्याचे मानधन आणि इतर पुरस्कारांच्या स्वरूपात वाटली जाणार आहे.
अंतिम सामना गमावला असला तरी न्यूझीलंडच्या संघालाही मोठी आर्थिक रक्कम देण्यात आली. उपविजेते म्हणून त्यांना 1.6 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 14.7 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या दोन्ही संघांना भरघोस आर्थिक लाभ झाला आहे.
याशिवाय स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनाही मोठे बक्षीस देण्यात आले. या दोन्ही संघांना सुमारे 7.24 कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम मिळाली.
सुपर-८ टप्प्यात पोहोचलेल्या झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांनाही प्रत्येकी अंदाजे 3.48 कोटी रुपये देण्यात आले.
गट फेरीतून पुढे जाऊ न शकलेल्या अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि युनायटेड स्टेट्स या संघांनाही प्रोत्साहनपर रक्कम म्हणून सुमारे 2.3 कोटी रुपये देण्यात आले.