महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे माती पूजन; वाघोलीत भव्यदिव्य स्पर्धेचे स्वरुप खेळाडू व प्रेक्षकांचे मन जिंकेल – केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजनावरुन उद्गार….

वाघोली : आजच्या वासापूजन व मातीपूजन समारंभाचे आयोजन रामकृष्ण सातव पाटील यांनी एवढे भव्य आणि मोठे केले आहे, यावरूनच समजते की स्पर्धा सुद्धा अतिशय भव्यदिव्य असेल.स्व. मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू केली. ही स्पर्धा सुरू करण्यामागे या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीपटूंनी मोठी कामगिरी करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावे असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील आयोजित 68 वी महाराष्ट्र केसरी 2025 -26 वाघोली, पुणे या ठिकाणी 18 ते 22 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी वासापूजन व मातीपूजन समारंभ सोमवारी (ता. 02) सकाळी दहा वाजता पार पाडला. यावेळी मोहोळ बोलत होते.
रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र केसरी विजेता पैलवानास टोयोटा फॉर्च्यूनर गाडी आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवानाला स्कार्पिओ एन गाडी किताब म्हणून देण्यात येणार आहे. या गाडीचे अनावरण सुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे मनपा नगरसेवक रामदास दाभाडे, नगरसेवक अनिल सातव, रत्नमाला सातव, श्रेयस खांदवे, तसेच मंगलदास बांदल, वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव, संजय सातव, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, सईद चाऊस, मल्ल सम्राट अस्लम काझी, किरण भगत, अभिजित कटके, नटराज सातव, काकासाहेब सातव, राहुल सातव , सुनील जाधवराव, भाजपा पुणे शहर चिटणीस केतन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना मोहोळ म्हणाले, “मला आयोजकांचे कौतुक वाटते की सर्व जिल्हा कुस्ती संघाकडून, सर्व जिल्ह्यातून याठिकाणी माती आणून तिचे पूजन करण्यात आले आणि त्यामाध्यमातून स्पर्धेच्या आखाड्याची निर्मिती होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन करताना आयोजक रामकृष्ण सातव यांनी ही स्पर्धा सर्वोत्तम झाली पाहिजे, तिचे आयोजन सर्वोत्कृष्ट असेल, ही त्यामागील त्यांची भावना आहे, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. या समारंभाच्या माध्यमातून त्यांनी आज एकप्रकारे ट्रेलर दाखवला आहे, त्यामुळे पिक्चर नक्कीच मोठा असणार आहे. आजवर कधीही एवढी भव्य महाराष्ट्र केसरी झाली नाही, अशी भव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा यावेळी होईल.
या कार्यक्रमाच्या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील म्हणाले, “महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, केंद्रीय राज्यमंत्री व कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधरजी मोहोळ व कुस्तीगीर संघातील सर्वांचे मी समस्त वाघोली ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिली.
सदर स्पर्धेचे आजवर महाराष्ट्रात झाले नसेल असे भव्य आणि नियोजनपूर्ण आयोजन आम्ही करून दाखवू. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील कुस्तीपटूंना पाठबळ मिळावे, कुस्तीला ताकद मिळावी, यासाठी आम्ही चांगल्या प्रकारची बक्षिसे देत आहोत. आपण सर्वजण मिळून आपल्या लाल मातीतल्या कुस्तीला मोठे करूया आणि यामाध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया”.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार….
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या क्रीडानगरीला दिवगंत नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार यांचे नाव दिल्याचे मोहोळ यांनी जाहीर केले. तसेच त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची हानी झाल्याचे नमूद केले. रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशी येथील नागरिकांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. 22) उपस्थित राहणार असल्याची माहिती ही यावेळी मोहोळ यांनी यावेळी दिली.