अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढल्यानं वातावरण तापलं ; थेट चौकशी करण्याचे आदेश,रोहित पवार म्हणाले…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर पवार कुटुंबीयांसह अख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यानंतर अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे भावनिक बॅनर अनेक शहरांमध्ये लावण्यात आले होते.अशातच आता कर्जत शहरात लावण्यात आलेले उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढून टाकल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे नागरिकांनी भावनिक वातावरणात लावलेले श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीकडून हटवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले,“ही कृती अत्यंत निषेधार्ह असून, ती अजितदादांचा अवमान करणारी आणि नागरिकांच्या भावनांवर घाला घालणारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुखी :भावनेने आणि जड अंतकरणाने लावलेले अजितदादांचे श्रद्धांजलीचे बॅनर नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले ही अत्यंत संतापजनक बाब आहे. याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितावर कारवाई करावी असं ट्विट त्यांनी केल आहे.

28 जानेवारी रोजी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
