अजितदादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, राजकारणात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?

पुणे : मुंबईहून बारामतीला अजित पवार निघाले असता बारामती विमानतळाच्या शेजारी त्यांच्या विमानाची मोठा अपघात झाला. सुरूवाला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी झाले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी आली. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तसेच अर्थमंत्रिपद वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारी देखील त्यांना देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षासंदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या बैठकीत यासदंर्भात एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले.
या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं एकत्र येत भाजपला थेट आव्हान दिलं, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणावं तेवढ यश मिळू शकलं नाही, दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी उमेदवार दिला जाणार नाहीये, अजित पवारांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाणार नाहीये.
राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्यानं आता या ठिकाणी भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. आज दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
