अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय….

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता.

बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझा मोठा भाऊ गेला. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे.
त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं, मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना इतर कोणत्याही योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी किंवा आर्थिक तरतूद आहे ती अतिशय उत्कृष्टपणे आणि उत्तमपणे अजित पवारांनी त्यावेळी संभाळली. त्यांच्या कामाचा चांगला अनुभव मला आहे, एकदा करायचं ठरवलं की अजित दादा ते करायचे, करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते, चांगला असेल तर काय करायचं तर करायचं म्हणायचे, जे वाईट आहे त्याला स्पष्टपणे नाही म्हणायचे, असा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे, मी असेन किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या तरी आम्ही पहाटेपर्यंत काम करायचो, अजित दादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे, अजित दादांनी पहाटे सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिल्या होत्या, त्यांच्या कामाचा अनुभव लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना देखील आहे. वेळेचे महत्व आणि भान ठेवून ते काम करायचे, असा नेता हरपला आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अपघाताची चौकशी व्हावी…
आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे, आणि तसेच या अपघाताची चौकशी देखील होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.