शासनाचा दणका! पुणे जिल्ह्यातील ६८ हजार रेशनकॉर्ड धारकांवर होणार कारवाई, नेमकं काय प्रकरण?

पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील ६८ हजार संशयास्पद रेशनकार्ड धारकांवर संक्रांत येणार आहे.

जिल्ह्यात तब्बल ६८ हजार संशयास्पद शिधापत्रिका प्रशासनाच्या रडारवर आल्या असून, येत्या काही दिवसांत या कार्डांवर कारवाईची तलवार लटकणार आहे. तसेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या तिन्ही भागांतील रेशनकार्डधारकांचा यात समावेश आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकांचे “शुद्धीकरण” अभियान हाती घेतले आहे. अनेक वर्षांपासून रेशनिंग व्यवस्थेत मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित झालेले लाभार्थी, तसेच एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त ठिकाणी रेशनकार्ड असल्याच्या तक्रारी येत होत्या. या गैरप्रकारांमुळे पात्र गरजू नागरिकांपर्यंत धान्य पोहोचण्यात अडथळे निर्माण होत होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने शिधापत्रिकांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेतंर्गत पुणे जिल्ह्यातील पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मधील तब्बल ६८ हजार संशयास्पद शिधापत्रिका प्रशासनाच्या रडारवर आल्या असून, त्यांच्यावर लवकरच अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.
प्रशासनाने आधार कार्ड क्रमांक आणि संगणकीय प्रणालीमधील माहितीच्या आधारे जिल्ह्यानुसार संशयास्पद लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींची तपासणी केली जात आहे, यात मृत व्यक्तींची नावे अद्यापही कार्डावर असणे, एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी (दुबार) असणे. माहितीमध्ये तफावत असलेले संशयास्पद लाभार्थी याचा तपास केला जात आहे.
सध्या पुरवठा निरीक्षक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. या पडताळणी अहवालाच्या आधारे कोणती नावे वगळायची, कोणती कार्डे रद्द करायची याचा अंतिम निर्णय तहसीलदार घेणार आहेत. योग्य कागदपत्रे सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड बंद होण्याची शक्यता आहे.
