पुणे सोलापूर महामार्गावर वाहने अडवून दहशद निर्माण करणाऱ्या दोघांना यवत पोलिसांनी दाखवला हिसका, केली मोठी कारवाई…


दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहने अडवून खाजगी एजंट असल्याचे सांगत २५ हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी दोघा संशयितांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे .

तुषार दत्तात्रय शेळके, (वय. २४, रा. शेळकेवस्ती वाखारी ता. दौंड जि. पुणे ) व रोहित गोविंद कड, (वय. ३३ रा. स्टेशन रोड, यवत ता. दौंड जि पुणे ) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ ते १५ ऑगस्ट ते दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव – चौफुला (वाखरी) जवळ घडली होती.

सोलापूर येथील वकील व्यावसायिक मधुसूदन हिरा सदाफुले हे त्यांचे कुटुंबासोबत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना वाखारी गावच्या हद्दीत पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची चारचाकी आणि राखाडी रंगाची स्विप्ट चारचाकी वाहनांमध्ये ३ ते ४ अनोळखी इसमांनी सदाफुले यांची गाडी अडवून या गाडीवर कर्ज असल्याचे सांगितले.

गाडीत सदाफुले यांची पत्नी व मुलगी असताना त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे अश्लील भाषेत शिवीगाळ व हावभाव करून २५ हजार रोख रक्कम जबरदस्तीने घेतले.

तसेच त्यापैकी एका व्यक्तीने त्यांना फोन करून तुमचे वाहन अडविण्याचा प्रकार माझ्याच माणसांनी केलेला आहे. ते जाऊ द्या, तुम्ही प्रकरण वाढवू नका, पोलीसांत तक्रार करू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. अशी फिर्याद वकिल सदाफुले यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी दोन चारचाकी वाहन व या गुन्हयातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!