‘नकारात्मक ऊर्जा’च्या नावाखाली तरुणीला फसवलं; अर्धनग्न फोटो मागणाऱ्या पुण्यातील कथित आध्यात्मिक गुरूचा भोंदूगिरीचा पर्दाफाश, पोलिसांनी थेट केली अटक


पुणे : स्वतःला आध्यात्मिक गुरू, मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख देणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने एका २२ वर्षीय तरुणीला भीती दाखवून तिच्याकडून अर्धनग्न फोटो मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात समोर आला आहे. शरीरातील ‘नकारात्मक ऊर्जा’ काढून टाकण्याच्या नावाखाली तरुणीवर दबाव टाकल्याचा आरोप असून, तिच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिव्य जितेंद्र परमार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून सोशल मीडियावर सक्रिय झाला. वयाच्या १८व्या वर्षापासून तो विविध ठिकाणी भाषणे देत असल्याचे सांगितले जाते. त्याने पुढे स्वतःचे सोशल मीडिया चॅनेल सुरू केले आणि त्यातून त्याचा चाहतावर्ग वाढला. त्यानंतर त्याने स्वतःला ‘आध्यात्मिक गुरू’ म्हणूनही सादर करण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला आणि तरुणींशी संपर्क साधत असे. त्यांना व्यायाम आणि शारीरिक हालचालींबाबत टिप्स देताना तो त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्येही हस्तक्षेप करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याच माध्यमातून संबंधित २२ वर्षीय तरुणीची आरोपीसोबत ओळख झाली. काही महिन्यांपासून दोघांची ओळख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यानंतर आरोपीने तरुणीला तिच्या शरीरात ‘नकारात्मक ऊर्जा’ असल्याचे सांगितले. ही ऊर्जा शारीरिक हालचालींच्या माध्यमातून बाहेर काढता येते, असा दावा त्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्याने तरुणीला वैयक्तिक स्वरूपाचे फोटो पाठवण्यास सांगितले. एवढ्यावरच न थांबता अर्धनग्न फोटो मागितल्याचा आरोप आहे. तरुणीने नकार दिल्यानंतर तिला भीती दाखवण्यात आल्याचेही पोलिस तपासातून समोर आले आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई करत दिव्य परमारला अटक केली. तपासादरम्यान त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला असून, त्यामधील संदेश, फोटो, व्हिडीओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने आणखी कोणत्या महिला किंवा तरुणींशी संपर्क साधला होता का, याचाही तपास केला जात आहे.

या प्रकरणात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ७५, ७८, ७९ आणि ३१८(४), महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील कलम ३(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण करून अध्यात्म, व्यायाम किंवा मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांकडून खासगी माहिती आणि फोटो मिळवण्याच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोपीच्या डिजिटल उपकरणांच्या तपासातून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे पोलिसांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!