सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदावर पुन्हा टांगती तलवार? माजी राष्ट्रीय सचिवांची दुसरी नोटीस; 26 फेब्रुवारीच्या निवडीवर गंभीर आक्षेप


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमायंडर नोटीस पाठवली आहे. 17 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या या नोटीसमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

सच्चिदानंद सिंह यांनी यापूर्वी 9 जुलै 2026 रोजी नोटीस पाठवत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली ही निवड पक्षाच्या घटनेनुसार झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर नोटीसला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता त्यांनी पुन्हा रिमायंडर नोटीस पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.

सुनेत्रा पवारांच्या निवडीवर नेमका आक्षेप काय?

सच्चिदानंद सिंह यांच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य पद्धतीने पार पडली. या निवडणुकीसाठी योग्य निवडणूक प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली नव्हती, असा त्यांचा आक्षेप आहे. तसेच स्वतःसह इतर राष्ट्रीय प्रतिनिधींना अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करण्याची, निवडणूक लढवण्याची किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नाही, असा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात आली आहे. मात्र, या आक्षेपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे मोठी जबाबदारी

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. पुढे 26 फेब्रुवारी रोजी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मात्र, आता त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच पक्षाच्या माजी राष्ट्रीय सचिवांनी आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. 9 जुलैच्या नोटीसनंतर 17 ऑगस्टची रिमायंडर नोटीस पाठवण्यात आल्याने हा मुद्दा पुढे कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सच्चिदानंद सिंह यांच्या आक्षेपांवर पक्षाकडून काय उत्तर दिले जाते आणि अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेबाबत पुढील कायदेशीर किंवा संघटनात्मक पाऊल उचलले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसमोरील हा वाद आता अधिकच गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!