महायुती सरकारला मोठा धक्का! अभिजीत दिपकेंची ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची थेट मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, खराब रस्ते, शाळांमध्ये सापांचा वावर आणि मूलभूत सुविधांचा अभाव यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पदावर राहू नये, अशी थेट मागणीही त्यांनी केली.
जिल्हा परिषद शाळांच्या परिस्थितीवर संताप
हिंगोली जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर दिपके यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या बदलीची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मुलांना किमान एक दिवस खराब रस्त्यांवरून पायी शाळेत पाठवावे, असे आवाहन केले होते. त्यानंतरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना रोज कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची जाणीव लोकप्रतिनिधींना होईल, असा दावा त्यांनी केला.


त्यांच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली, मात्र काही आदिवासी विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोपही दिपके यांनी केला.
शाळांमध्ये सापांचा वावर; शिक्षणमंत्र्यांवर टीका
खराब रस्त्यांसोबतच सर्पदंशाच्या घटनांचाही मुद्दा दिपके यांनी उपस्थित केला. सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. उजनी येथील शाळेचा उल्लेख करत त्यांनी शाळेच्या परिसरातच नव्हे, तर वर्गखोल्यांमध्येही साप आढळत असल्याचा दावा केला.
या परिस्थितीवरून त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली. सरकार बदलल्यानंतरही जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अपेक्षेप्रमाणे सुधारलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेची तयारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर चर्चेसाठी बोलावल्यास आपण भेटण्यास तयार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद शाळांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याची आवश्यकता नसून, स्थानिक पातळीवरील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न सोडवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे दिपके म्हणाले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन शाळांच्या समस्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
मागील सरकारच्या काळातील परिस्थितीचा दाखला देऊन सध्याचे सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. सत्तांतरानंतरही जिल्हा परिषद शाळांची अवस्था सुधारलेली नाही, असा दावा करत दिपके यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.