हत्या कशी केली, कुणाकुणाचा सहभाग?, आयुष कोमकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची हादरवणारी माहिती समोर…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी १३ आरोपींनी खुनाचा कट रचून आयुषला संपविल्याचे न्यायालयात सांगितले आहे.

यादरम्यान हत्या कशी केली, कुणाकुणाचा सहभाग होता, याची माहिती देखील पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. पोलिसांच्या मते, आंदेकर टोळीने कोमकर कुटुंबावर बदला घेण्यासाठी हा कट रचला.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, बंडू आंदेकर याच्या मुलगा वनराज आंदेकरची हत्या झाल्यानंतर त्याला झालेल्या वेदनेइतकंच दु:ख जावयालाही व्हावं, म्हणून आयुष कोमकरचा बळी घेतल्याचा संशय आहे. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर थेट आरोप केले आहेत.

दरम्यान, या हत्येचा कट एकूण १३ जणांनी रचला होता. त्यापैकी दोन आरोपींनी भवानी पेठमधील पार्किंगमध्ये आयुषवर थेट पिस्तूलने गोळ्या झाडल्या. उर्वरित आरोपींनी योजना आखली होती. आरोपींकडील पिस्तूल, गोळ्या आणि वापरलेली दुचाकी जप्त करणे, तसेच हे शस्त्र कुठून आणले याचा तपास पोलिसांना करायचा आहे. पाच आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात आणखी एक दावा केला आहे. या टोळीने याआधी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची रेकी केली होती आणि आंबेगावात त्यांच्या घरी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. आरोपींपैकी अनेक हे आधीपासूनच गंभीर गुन्ह्यांत सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही आरोपींवर २-३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
हत्या करून अमन पठाण आणि यश पाटील यांनी “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच” अशा घोषणा देत परिसरात दहशत पसरवली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील गुन्ह्यात क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे कलमवाढ केली आहे.