राष्ट्रीय खेळाडूच्या आयुष्याला काय लागलं ग्रहण? पोक्सो प्रकरण, पिस्तूल अन् 21 ऑगस्टच्या सुनावणीआधी पुण्यात तुकाराम करांडेचा धक्कादायक अंत


पुणे : बीडमधील राष्ट्रीय पातळीवर खो-खो खेळलेल्या तुकाराम करांडेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोक्सो प्रकरणात आरोपी असलेला तुकाराम पुण्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्याविरोधात पोक्सोच्या गुन्ह्यासह अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार होती. त्याआधीच ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

तुकाराम करांडेने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दोन वेळा स्थान मिळवत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बार्शी रोड परिसरात अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आल्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता.

दरम्यान, बीड तालुक्यातील एका गावातील शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी गेले असताना एका अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली होती. संबंधित मुलीने नंतर तुकाराम आणि त्याच्या मित्रांविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. मैत्रीचा गैरफायदा घेत ब्लॅकमेल केल्याचा तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुकाराम बीडमधून पसार झाला होता.

या प्रकरणात तुकाराम आणि त्याच्या मित्रांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर 18 ऑगस्ट रोजी सुनावणी अपेक्षित होती; मात्र ती होऊ शकली नाही. त्यानंतर 21 ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यातच तुकारामविरोधात अवैध पिस्तूल प्रकरणही दाखल असल्याने जामीन मिळण्याबाबत तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

पुण्यातील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोक्सो प्रकरण, अवैध पिस्तूल प्रकरण आणि त्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. तुकारामच्या मृत्यूमागे नेमकी कोणती परिस्थिती होती, याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!