सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 2025 च्या NIRF रँकिंगमध्ये मोठी घसरण, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला संताप..

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 2025 च्या NIRF ranking मध्ये मोठी घसरण झाली आहे. 2018 साली देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 16 व्या स्थानी असलेलं हे विद्यापीठ 2025 मध्ये तब्बल 91 व्या स्थानापर्यंत खाली घसरलंय. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत रोहित पवार म्हणाले, रखडलेली प्राध्यापक भरती, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या समस्या, विद्यापीठाच्या आवारातील वाढता राजकीय हस्तक्षेप इ. समस्यांवर काम करायचं सोडून विद्यापीठात राजकीय कार्यक्रम भरविण्यात व्यस्त असणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाचंच हे कर्तृत्व म्हणावं लागेल, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच ते म्हणाले, याचा फटका मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसणार आहे. दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी विद्यापीठाचा दर्जा वाढणं गरजेचं आहे. राज्य शासनाने आणि विद्यापीठ प्रशासनाने आता तरी शहाणं व्हावं आणि योग्य उपाययोजना कराव्यात, ही अपेक्षा, असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, ‘निवृत्त प्राध्यापकांच्या जागी नवीन नियुक्त्या झालेल्या नाहीत. याचा थेट परिणाम विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरावर झाला आहे. प्राध्यापकांच्या निवृत्तीमुळे शोधनिबंधांची संख्या घटली आहे. त्यामुळे क्रमवारीवर परिणाम झाला आहे.
या आव्हानांवर मात करण्यासाठी विद्यापीठाने सकारात्मक पावले उचलली आहेत. सार्वजनिक प्रतिमा निर्मितीवरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे,’ असे स्पष्टीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले. यामुळे आता यामध्ये काही बदल होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.