विरार इमारत दुर्घटना ; तब्बल 36 तासानंतर दोन मृतदेह ढिगार्यातून बाहेर काढण्यात यश, मृतांचा आकडा 17 वर

मुंबई : विरार पूर्वेतील विजय नगर परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेच्या तब्बल 36 तासानंतर आणखी दोन मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. एका महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबवले जात आहे.एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 9 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर वसई विरार महापालिकेने विरार पोलीस ठाण्यात अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यवसायिकाला विरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
