अहिल्यानगर एमआयडीसीत खंडणीखोरांचा हैदोस ; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल

नगर: अहिल्यानगर एमआयडीसीतील खंडणी प्रकरणाने राजकीय वर्तुळासह औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.एमआयडीसीतील खंडणीखोरांच्या बंदोबस्तासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी अहिल्यानगर एमआयडीसीतील एक्साइड कंपनीच्या कच्च्या मालाचा पुरवठा खंडणीसाठी अडविणाऱ्या टोळीविरोधात कठोर कारवाई करून औद्योगिक कंपन्यांना तात्काळ सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून एमआयडीसीतील उद्योजक व कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करुन खंडणीखोरांच्या बंदोबस्ताबाबत मंत्री सामंतांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत सामंत यांनी लवकरच अहिल्यानगर शहरात उद्योजक व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अहिल्यानगर व तालुक्यातील जवळपास 3 हजार कामगार एक्साइड कंपनीत कार्यरत आहेत. 7 ऑगस्ट रोजी पुणे व नाशिक येथून कंपनीकडे जाणारा कच्च्या मालाचा पुरवठा आकाश दंडवते व त्याच्या टोळीने खंडणीसाठी थांबविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासनाच्या वतीने गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.यानंतर युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकारातून व दत्ताभाऊ तापकीरे यांच्या सहकार्याने कच्च्या मालाचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. परंतु या घटनेनंतर गलांडे व तापकीरे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न धोक्यात येऊ नये व उद्योजकांना सुरक्षित वातावरणात कामकाज करता यावे यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे. उद्योजकांचे संरक्षण, कामगारांचे हित आणि एमआयडीसीतील उद्योग सुरक्षित ठेवण्यासाठी खंडणीखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनात केली.