कोकाटेनंतर पुण्यातील माजी महापौरांचा प्रताप ; महत्त्वाच्या बैठकीत गेम खेळण्यात दंग, नागरिक संतापले…

पुणे : राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेतील सभागृहामध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. या घटनेनंतर आता पुण्यातील माजी महापौर सिद्धार्थ धेंडे चर्चेत आले आहेत. एका महत्वाच्या बैठकीमध्ये सिद्धार्थ धेंडे हे मोबाईलमध्ये गेम खेळण्यात दंग असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे..

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे माजी महापौर आणि माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आंबेडकर स्मारकाबाबत महत्वाची बैठक सुरू असताना गेम खेळण्यात दंग होते. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आंबेडकरी समाजात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पुणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर बैठका आयोजित केल्या जात आहेत. अशाच एका बैठकीत पुण्यातील बुध्द विहारात गंभीर चर्चा सुरू असताना वरिष्ठ नेता सिद्धार्थ धेंडे हे मोबाईलवर गेम खेळताना दिसून आले. सगळे बैठकीतील चर्चा ऐकत असताना ते मात्र गेम खेळत होते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, समारंभ सुरू असताना नुकताच मोबाईल हाती घेतला आणि नेमका त्याच वेळी कोणीतरी हा व्हिडिओ काढला. माझ्या कृतीमुळे समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मला माझ्या समाजाची माफी मागायला अजिबात कमीपणा वाटत नाही. विरोधक जाणूनबुजून सुपारी घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
..
