रक्षांबंधनादिवशी कपाट उघडलं अन् धक्काच बसला! आईनेच मुलीविरुद्ध केली तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?


छत्रपती संभाजीनगर : आईसाठी पोटच्या पोरीवरच गुन्हा दाखल करण्याची वेळ येणं, यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव कोणतंही नसावं. अशीच एक हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे.

एका आईने आयुष्यभर कष्ट करून जमा केलेले सोन्याचे दागिने आणि रोकड तिच्याच १९ वर्षांच्या मुलीने मित्रासाठी चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आणि त्यांना पोटच्या मुलीसह त्या मित्रावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.

मंगेश विलास पंडित (वय-19, रा. बेगमपुरा) असे अटक केलेल्या मित्राचे नाव असून, अल्पवयीन मुलगी फरार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोग्य विभागातून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या 58 वर्षीय महिला आपला मुलगा आणि मुलीसह हडको परिसरात राहतात. तिने आपल्या मुलांसाठी आणि संसारासाठी 14 ते 15 तोळे सोन्याचे दागिने जमा केले होते. या दागिन्यांसोबतच घरात 1 लाख 55 हजार रुपयांची रोकडही होती. आपल्या मुलामुलींच्या भविष्यासाठी ती प्रत्येक गोष्ट जपून ठेवत होती.

9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते. त्यावेळी तिच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. जेव्हा तिने कपाट उघडून पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कपाटातील डब्यात एकही दागिना नव्हता आणि सोबत असलेली 1 लाख 55 हजार रुपयांची रोकडही गायब होती. सुमारे 14.1 तोळ्यांचे दागिने आणि मोठी रक्कम चोरीला गेल्याने तिला मोठा धक्का बसला. तिने मुलाला विचारले, पण त्याला काहीच माहीत नव्हते.

अकरावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीकडे विचारपूस केली, तेव्हा ती मात्र गडबडून गेली. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपला मित्र मंगेश विलास पंडित याला दागिने व पैसे दिल्याचे कबूल केले.

तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि उपनिरीक्षक सचिन देशमुख यांनी तात्काळ कारवाई करत मंगेशला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मंगेशने गुन्हा कबूल केला. त्याने मैत्रिणीला भावनिक करून तिच्याकडून दागिने आणि पैसे घेतल्याचे सांगितले.

पण हे सर्व दागिने विकून आलेले पैसे खाण्यापिण्यावर उडवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंगेशला अटक केली आहे. त्याने दागिने कुठे विकले आणि पैशांचे काय केले, याचा पुढील तपास सुरू असल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!