पोलिसांना धक्काबुक्की करणं हर्षवर्धन जाधव यांना भोवलं, न्यायालयानं ठोठावली १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

मुंबई : माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले नेत हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाने दणका दिला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावणं त्यांना चांगलच महागात पडलं आहे.

या प्रकरणी कोर्टाने जाधव यांना दोषी ठरवलं आहे. शिवाय त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा ही सुनावली आहे. हर्षवर्धन जाधव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा या मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.
घटनेच्या वेळी हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार होते आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हा प्रकार ६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर येथील हॉटेल प्राइडमध्ये घडला होता, जिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी बंदोबस्त असलेल्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या पोलिस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना रोखले. यानंतर जाधव आणि पराग जाधव यांच्यात वाद झाला आणि हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावर धक्काबुक्की व कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही पहिली वेळ नाही की हर्षवर्धन जाधव यांच्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप झाला आहे. ५ जानेवारी २०११ रोजी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर भेटीदरम्यान, वेरूळ लेणी परिसरात शासकीय बैठकीच्या ठिकाणी पोलिसांशी झटापट झाली होती.