पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, तीन दहशतवाद्यांचा ‘ऑपरेशन महादेव’अंतर्गत खात्मा…

जम्मू काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत, सोमवारी (28 जुलै) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. तीन दहशतवाद्यांमध्ये सुलेमान शाहची ओळख पटली आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमानचा सहभाग होता.

तसेच 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारले होते. यात एक काश्मिरी नागरिक सहभागी होता. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारले.
जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात चकमक झाली. आज, सोमवारी झालेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हे ऑपरेशन सुरू केले होते. विशेष म्हणजे संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर या विषयावर चर्चा सुरु असतानाच ऑपरेशन महादेव बाबत आनंदवार्ता आली.

भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’ (ट्विटर) सोशल मीडिया अकाऊण्टवर यासंदर्भात माहिती दिली. “सातत्याने झालेल्या गोळीबारानंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी आसिफ फौजी (कोडनेम मुसा), सुलेमान शाह (युनुस) आणि अबू तल्हा (आसिफ) यांचा सहभाग होता. इतर दोन दहशतवादी आदिल गुरी आणि अहसान हे स्थानिक दहशतवादी होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ले करून 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यानंतर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली.
आजही संसदेत ऑपरेशन सिंदूरवरून गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा सुरू आहे. तिन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळावरून एक अमेरिकन बनावटीची कार्बाइन, एक AK-47 रायफल, 17 रायफल ग्रेनेड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमान, यासिर आणि अली यांचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमान आणि यासिर यांचा सहभाग होता. या भागात चौथ्या दहशतवाद्याची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.