शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा एल्गार!! आज राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू..

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. प्रहार संघटना राज्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’ या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी अलीकडेच विदर्भात व्यापक पदयात्रा काढली होती. या पदयात्रेदरम्यानच आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची दिशा ठरवण्यात आली होती. त्यानुसार, शासनाला दडपणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. रस्त्यावर ठिय्या देत आंदोलकांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे की, केवळ आश्वासनांवर वेळ काढणाऱ्या शासनाला आता प्रत्यक्ष निर्णय घ्यायला भाग पाडले जाईल. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले होते. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उग्र उपोषण सुरू होते. सरकारच्या यशस्वी मध्यस्थीनंतर 6 दिवसांनी त्यांनी उपोषण मागे घेतले.
मंत्री उदय सामंत यांनी मोझरीत येऊन सरकार बच्चू कडू यांच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याची भूमिका त्यावेळी मांडली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातून सात बारा कोरा करण्यासाठी पदयात्रा काढली.