पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा करून आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचे जंगी स्वागत, एकनाथ शिंदे यांनी मारली मिठी, नेमकं काय घडलं?

मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगाला करून देत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा करण्याची जबाबदारी पूर्ण करून परतलेल्या शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिका मांडण्यासाठी सौदी अरेबिया, सिरिया लिओन, लायबेरिया आणि कोंगो या चार देशात गेलेले शिष्टमंडळ आज आपला दौरा यशस्वी करून मायदेशी परतले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना मिठी मारली.
या सर्वच देशांनी भारताने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत आपल्या भूमीवर होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना पायबंद घालण्याचा हक्क भारताला असल्याचे स्पष्टपणे सांगितले. या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी डॉ.श्रीकांत यांना दिल्याबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले.
तसेच या शिष्टमंडळात एस. एस. अहलुवालिया यांच्यासारखे बुजुर्ग आणि ज्येष्ठ खासदार सोबत असल्याने हे काम अधिक सोपे झाल्याचे मत व्यक्त केले. वडील म्हणून डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहेच. मात्र दहशतवाद कसा गाडायचा याची शिकवण या मातीतील प्रत्येक मावळ्याला देणाऱ्या शिवप्रभूंना त्यांच्या शिवराज्याभिषेक दिनापूर्वी श्रीकांतने दिलेली ही खरी मानवंदना आहे असेच मी समजतो.
यावेळी मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना परिवारातील सदस्य उपस्थित होते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.