धक्कदायक! मोठ्या बहिणीसोबत टीव्हीच्या रिमोटवरुन वाद, १० वर्षांच्या मुलीने संपवले जीवन…

गडचिरोली : टीव्ही पाहताना रिमोटवरुन दोन बहिणींमध्ये वाद झाला आणि त्यातून धक्कादायक प्रकार घडला. चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या सोनाली आनंद नरेटी आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

केवळ टीव्हीवरील चॅनेल पाहण्याच्या क्षुल्लक वादातून तिने आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. सोनालीने घराच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
तिची मोठी बहीण संध्या (वय. १२) हिच्यासोबत टीव्हीच्या रिमोटवरून किरकोळ वाद झाला होता. माझं आवडतं चॅनेल पाहू दिलं नाही, या रागाच्या भरात सोनालीने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणावरून एका लहान मुलीने आपले जीवन संपवल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सोनाली, संध्या आणि तिचा लहान भाऊ सौरभ (वय. ८) हे तिघेही सध्या गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा गावातील एका खासगी आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने ते आपल्या गावी, बोडेना येथे आली होती. घरी त्यांची आई मंगला आणि सर्वात लहान भाऊ शिवम (वय अंदाजे ४-५ वर्षे) राहत होते. वडील आनंद नरेटी हे मोलमजुरीसाठी बाहेरगावी असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे बोडेना गावात आणि सोनालीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत असून, सोनालीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.