पुणे रिंग रोडचे अडीच वर्षात काम पूर्ण करण्याचे आहे उद्दिष्ठ! रिंगरोडच्या बांधकाम पूर्ण होण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ नियोजन सुरू…


पुणे : पुणे रिंग रोड प्रकल्प हा एक महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित निर्णय असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचला आहे, आणि पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरते.

हा रिंग रोड म्हणजे पुण्याच्या भोवतालचा १६९ किलोमीटर लांबीचा वळसा मार्ग असून, तो ११० मीटर रुंद असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ४२,७११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे शहरातील वाहतूक शहराबाहेरील मार्गावर वळवली जाईल आणि शहराच्या मुख्य भागातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, इंधन व वेळेची बचत करणे आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे.

एमएसआरडीसीचे पुणे विभागाचे मुख्य अभियंते राहिल वसईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंग रोडचे काम एकाचवेळी नऊ वेगवेगळ्या विभागांमध्ये सुरू करण्यात आले आहे. हे विभाग म्हणजे वडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी आणि सोरतापवाडी. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले असून, काही ठिकाणी माती भरणे, सपाटीकरण, नदी-ओढ्यांवर पूल उभारणीसारखी कामे जोरात सुरू आहेत. यासाठी नऊ बांधकाम कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असून, ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दरम्यान, प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींचे संपादन हे एक मोठे आव्हान होते. मात्र, प्रशासनाने यामध्ये मोठे यश मिळवले असून, पश्चिम भागातील ९९% आणि पूर्व भागातील ९८% जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. करारानुसार या प्रकल्पाचे काम कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतर अडीच वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. अर्थातच, पावसाळ्यामुळे काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात, मात्र काम नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू राहील, असे वसईकर यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!