हवेलीत भाजप ‘वरिष्ठांनी कमविलेले, स्थानिकांनी गमविले ‘ ! बाजार समितीत भाजपच्या चारच गड्यांना बसविले घोड्यावर…!


उरुळी कांचन : जयदीप जाधव

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे १९ वर्षाच्या कालखंडानंतर गमावलेले तालुक्याचे अस्तित्व पुन्हा बहाल झाले आहे. या बाजार समितीवर तालुक्याचे अस्तित्व अबाधित रहावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची आग्रहाखातर या बाजार समितीला तालुक्याचे अस्तित्व देण्याच्या विशेष अधिकाराने १९ वर्षानंतर लोकनियुक्त संचालक मंडळाची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र भाजपच्या प्रयत्नांचे परिणाम भाजपच्याच अंगलट येतील काय, अशी चिन्हे एकंदरीत उमेदवारी वाटपावरुन दिसू लागली आहे. या उमेदवारी वाटपात भाजपला राष्ट्रवादीच्या बंडखोरांच्या सर्वपक्षीय पॅनेलने केवळ ग्रामपंचायतीच्या ४ जागांवर बोळवण केल्याने भाजपच्या ‘ वरिष्ठांनी कमविलेले’ स्थानिक नेत्यांनी मात्र गमविल्याचा सूर ‘ भाजपचेच पदाधिकारी बोलत आहे.

 

शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघात हवेली कृषीउत्पन्न बाजार समितीचे मोठे क्षेत्रफळ येत असल्याने भाजपची हवेली तालुक्यातील ताकद वाढविण्यासाठी हवेली बाजार समिती व यशवंत कारखान्याबाबत मोठे सकारात्मक निर्णय घेऊन भाजपचा या भागातील जनाधार वाढविण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केले आहेत.

 

या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यां पाठिमागे ताकद देऊन या संस्था नव्याने तालुक्याच्या नावारुपाला येईल यासाठी वरिष्ठ नेतृत्वाकडून मदत केली जात आहे. त्यासाठी हवेली बाजार समितीचे अस्तित्व भाजपच्या एका ग्रामीण भागातील आमदारांच्या मदतीने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केले आहे. मात्र निवडणुकीच्या मोबदल्यात भाजपला काय मिळाले, म्हणून भाजपचेच पदाधिकारी स्थानिक नेतृत्वाविषयी खडे फोडू लागले आहेत.

हवेली तालुक्यात राष्ट्रवादी प्रमाणेच भाजपचे संघटन आहे. राष्ट्रवादी च्या खालोखाल भाजपचे संघटन असल्याने भाजपला मोठी संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली काय असे कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे.बाजार समितीच्या चालू रणधुमाळीत भाजप हा राष्ट्रवादीच्या बंडखोर गोटात सामील झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.या सर्वपक्षीय पॅनेलने भाजपसहीत उध्दव गटाला सामील करुन घेत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व रणधुमाळीचे अंतिम सर्वपक्षीय पॅनेलचे चित्र तयार झाले असून भाजपला ग्रामपंचायतीच्या फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागत असल्याची चर्चा आहे. सर्वपक्षीय पॅनेलने उध्दव गटाला दोन जागा देताना भाजपला ४ जागांवर बोळवण केल्याने भाजपचा नाममात्र चंचूप्रवेश होणार का ? हे आता उघड झाले आहे.

 

 

पुणे जिल्ह्यात भाजपने सत्ता येण्यापूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वबळावर जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व गटात जागा लढविल्या होत्या.’क’ वर्ग प्रतिनिधी गटात भाजपचे हवेली तालुक्यातील उमेदवार प्रदिप कंद हे विजयी झाले होते. तर उर्वरीत जागांवरही भाजपने चांगली मते खेचली होती. मात्र त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर घोडंगगा कारखाना या सहकारी संस्थेत मात्र डोळेझाक केली. या संस्थेवर स्थानिक नेत्यांनीच सोईची भूमिका घेतल्याने भाजपला यश मिळू शकले नाही. अशीच काही आवस्था हवेली बाजार समितीत दिसू लागली आहे. फक्त काही जागांवर निवडणूक लढल्याने भाजपला आगामी निवडणुकीत कितपत लाभ होईल अशा यशाची खात्री खुद्द कार्यकर्त्यांनाच देता येईना ,असा चर्चेचा सुर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!