यंदा हरभऱ्याचे दर दबावाखाली राहणार! मोदी सरकारकडून ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात..

नवी दिल्ली : सध्या हरभरा काढणीकडे शेतकऱ्यांचा कल असून नवीन हरभरा बाजारात विक्रीसाठी येत आहे. देशातील शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात केला आहे. यामुळे डाळीचे दर कमी होणार का? याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

११ फेब्रुवारी रोजी मुंद्रा बंदरावर ऑस्ट्रेलियन जहाज दाखल होत आहे. त्यामुळे पुढील काळात हरभऱ्याचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकऱ्यांना कमीत कमी ४ हजार ८२५ रुपये तर सरासरी ७ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळतो आहे.
येणाऱ्या काळात यामध्ये फारसा बदल होईल याचीही शक्यता कमीच आहे. ऑस्ट्रेलियातून २६२५५.८५० मे.टन हरभरा आयात केला आहे. पुढील दोन दिवसांत आयात केलेला हरभरा भारतात दाखल होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरभरा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगाम २०२३-२४ साठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत ५४.४० रुपये प्रति क्विंटल आहे. मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर हरभऱ्याच्या आवकेमध्ये २८.५९% वाढ झाली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. यामुळे दर स्थिर असतील, असा अंदाज आहे.
बाजारात कमी दरातील हरभरा खरेदीवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. मागील आठवड्यात लातूर बाजारात हरभ-याला प्रति क्विंटल ५ हजार ५५६ रुपये, अमरावती बाजारात ६ हजार ८४ रुपये, हिंगणघाट बाजारात ५ हजार ४३९ रुपये, खामगाव बाजारात ५ हजार १०९ रुपये, उदगीर बाजारात ५ हजार ५५६ रुपये दर मिळाला. या आठवड्यात दर कमी झाले आहेत.