ॲपवर झालेली ओळख अंगाशी आली!! तरुणाला भेटण्यासाठी बोलावून घेतले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना…

पुणे : मैत्रीसंबंध निर्माण करणाऱ्या ॲपवरुन झालेली ओळख तरुणाला महागात पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ॲपवर झालेल्या ओळखीनंतर तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याला लुटण्यात आल्याची घटना हडपसर रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे.

तसेच चोरट्यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील ४२ हजारांची सोनसाखळी चोरुन नेली आहे. याबाबत तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार २४ वर्षीय तरुण हडपसर भागात राहायला आहे. त्याची एका ॲपवरुन तरुणाशी ओळख झाली होती. २३ जानेवारी रोजी तरुणाला आरोपीने हडपसर रेल्वे स्थानक परिसरात बोलावून घेतले.
लक्ष्मी लाॅन परिसरात एका शेतात तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील ४२ हजारांची सोनसाखळी चोरली. त्यानंतर तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन या प्रकाराची कोणाला वाच्यता करु नको, असे सांगितले. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
दरम्यान, याच परिसरात एका आयटी इंजिनिअर तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. ॲपवरुन झालेल्या ओळखीतून तरुणाला हडपसर रेल्वे स्थानक परिसरात बोलावून चोरट्यांनी त्याला मारहाण केली होती. चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड लुटली होती.
अशाच प्रकारची घटना धायरीतील डीएसके विश्व रस्ता परिसरात घडली होती. व्यावसायिक व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याला लुटण्यात आले होते. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते.
