Ring Road : रिंग रोडच्या भूसंपादनासाठी एमएसआरडीसीकडे ‘एवढ्या’ कोटींची मागणी…

Ring Road : रिंग रोडच्या उर्वरित भूसंपदानासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) ५०० कोटींचा निधी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बुधवारी बैठक घेतली, त्या वेळी भूसंपादन समवन्वयक कल्याण पांढरे, तसेच विविध ठिकाणचे भूसंपादन अधिकारी आदी उपस्थित होते.
पुणे रिंग रोडसाठी लागणार्या जमिनीचे सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूर्व आणि पश्चिम भागांतील सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. त्याकरिता आणि यापूर्वीच्या निवाड्याचा मोबादला देण्यासाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

तसेच १५ डिसेंबरपर्यंत जमीनमालकांनी संमतीने जमीन दिल्यास पाचपटीने मोबादला दिला जाणार आहे. १५ डिसेंबरनंतर मात्र सक्तीने भूसंपादन केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Ring Road
पूर्व भागातील १४३ आणि पश्चिम भागातील ६३ हेक्टर म्हणजे २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. उर्वरित सुमारे १३०० हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या क्षेत्राचे निवाडे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे भूसंपादन समन्वय अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्व भागातील पुरंदर, भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांतील तसेच पश्चिम भागातील खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील काही क्षेत्राचे संपादन करणे बाकी आहे. १५ डिसेंबरपूर्वी संमतीने जमीन देण्याची इच्छा असणार्या जमीनमालकांनी भूसंपादन अधिकार्यांशी संपर्क साधून संमती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.