पुण्यात स्पीड ब्रेकरवर आदळली पीएमपीएल बस, महिलेचा मोडला मणका…!

पुणे : पुण्यातून सध्या एक बातमी समोर आली आहे. भरधाव पीएमपीएल बस स्पीड ब्रेकरवर जोरात आदळून झालेल्या घटनेत एका महिला प्रवाशाचे ३ मणके मोडल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ही घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातील वानवडी भागात घडली होती. या प्रकरणी आता महिला प्रवाशाने पोलिसांत तक्रार दिली असून पीएमपीएल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि त्यांची बहीण सायरा या दोघी ही PMPML बस ने प्रवास करत होत्या. यावेळी बस गिरमे शाळेसमोर आली असता बस चालकाने त्याच्या ताब्यात असलेली बस वेगाने त्या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकर वर आदळली.
वेगात असल्यामुळे याचा हादरा ही जोरात होता. यातच सिद्धकी यांच्या पाठीला मार बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवले असता त्यांच्या पाठीचे ३ मणके फ्रॅक्चर असल्याचे कळाले.
अक्षय दुबे (३२) असे या बस चालकाचे नाव असून वानवडी पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धकी यांनी उपचार घेऊन आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यामुळे पीएमपीएल बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.