पाषाण येथील बांधकाम व्यावसायिकाची १४ कोटींची फसवणूक ; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल…!

पुणे : जमीन बांधकाम व्यावसायिकाला विकसनासाठी देण्यात आली होती. परंतु विकसनाचा करार मोडून बांधकाम व्यावसायिकाची तब्बल १४ कोटी ५० लाखाची फसवणूक केल्याची घटना पुण्यातील पाषाण परिसरातून समोर आली आहे. ही घटना सन 2006 ते जानेवारी 2023 या कालावधीत घडली आहे.

विजय जगदीशचंद्र अगरवाल (वय. ६५ रा. नारंगीबाग रोड, पुणे) असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अशोक शिवनारायण थेपटे (वय.७४) आणि अमित अशोक थेपटे (वय. ४७ दोघे रा. मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विजय अगरवाल यांनी स्वत: विकसित करण्यासाठी पाषाण येथील जमीन ऑगस्ट 2006 मध्ये घेतली होती. ही जमीन त्यांनी मे. गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. चे संचालक अशोक थेपटे व अमित थेपटे यांना विकसनासाठी दिली होती. जमिनीवर विकसन करुन 55 टक्के फिर्यादी तर 45 टक्के आरोपी यांच्या कंपनीला देण्याचे ठरले होते. संबंधित बांधकामाचा ताबा 15 महिन्यात करुन देण्याचे ठरले असताना आरोपींनी मुदतीत ताबा दिला नाही.

त्यामुळे 2007 व 2010 मध्ये फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पुन्हा करार होऊन आरोपींना बांधकामासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आरोपींनी ताबा दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी एप्रिल 2016 मध्ये नोटीस पाठवली. सर्व हक्क व पॉवर ऑफ अॅटर्नी संपुष्टात आली असताना आरोपींनी संबंधित हक्क आपल्याकडे असल्याचे दाखवून खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली.
ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्याद्वारे सेवा विकास बँक व धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी यांच्याकडून 30 कोटी 75 लाख रुपये कर्ज घेऊन फिर्यादी यांच्या हिश्श्याचे 4 कोटी रुपयांचे 2500 स्के फुटाचे दुकान आणि 10 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 10 हजार 500 स्के फुटाचे ऑफीस न देता 14 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांची फसवणूक झाल्यावर त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अशोक थेपटे व अमित थेपटे यांच्यावर आयपीसी 420, 406 ,409 , 464 ,465 , 467 ,468 , 471 , 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.