Lok Sabha Election 2024 : हवेलीत ‘घड्याळाची टिकटिक की तुतारीचा आवाज? मतदान संपताच कार्यकर्त्यांच्या पैजा सुरू…!


जयदिप जाधव

उरुळीकांचन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे व त्यापाठोपाठ विधानसभेला अशोक पवार यांना ‘कसं निवडून येतो ते बघतोच ‘असं खुलं आव्हानं दिल्यामुळे सर्वात चर्चेत व हॉट सिट झालेल्या शिरुर लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान झाले आहे.

या आव्हान व प्रतिअआव्हानांमुळे शिरूरच्या निकालाकडेही आता तमाम राज्यभराच्या नजरा रोखून बसल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिरुर विधानसभेला जोडलेल्या पूर्व हवेली तालुक्यातूनही या लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने मतदान झाले असून शहरी व ग्रामीण भागात मताधिक्याच्या आकडेवारीने चर्चा सुरू झाली आहे.

अखंड राष्ट्रवादी चे पूर्वाश्रमीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप व महायुतीसोबत जाऊन वेगळे बस्तान बसवून या त्यांच्या निर्णयात सहभागी न झालेले खासदार अमोल कोल्हे व शिरुर विधानसभेचे आ.अशोक पवार यांना धडा शिकविणार असे आव्हान दिले आहे. या आव्हानामुळे शिरुर लोकसभेला काय होणार म्हणून बारामतीनंतर शिरुरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांत कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढविणाऱ्या या निवडणुकीत विजय कोणाचा होणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिरूर विधानसभेला जोडलेल्या हवेलीच्या ४० गावांत चुरशीने झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची आकडेमोड सुरू झाली आहे. Lok Sabha Election 2024

हवेली तालुक्यातील पुणे- नगर रोडचा भाग व पुणे -सोलापूर रोडचा भाग या मतदारसंघात सामाविष्ठ होतो. या भागात वाघोली, कदमवावस्ती, उरुळीकांचन, लोणीकंद तसेच थेऊर , कोलवडी, केसनंद व कुंजीरवाडी या प्रमुख गावांचा सामावेश होत असल्याने या भागातून लीड कोणाला जाणार म्हणून शब्दांचे व पैजांचे खेळ सुरू झाले आहेत. प्राथमिक जाणकार विश्लेषकांनी स्थानिक परिस्थिती व राजकीय परिस्थितीने या भागात कोणाचा जोर वाढणार म्हणून तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार पुणे- नगरचा महामार्गावरील वाघोली परिसरात घडाळ्याचा गजर तसेच प्रदीप कंद यांच्या हक्काचा गड असलेल्या भिमा व मुळा मुठा नदीकाठी गावांत घड्याळाचा गजर झाल्याची चर्चा आहे. तर सोलापूर रोडवरील काही गावांत तुतारी वाजणार असल्याची चिन्हे दिसत असून काही भागात घड्याळाने टाईमिंग साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे हवेलीत कोणाला लीड राहणार म्हणून उत्सुकता वाढली आहे.

भाजपचा राष्ट्रवादीला आधार…

शिरुर लोकसभेसाठी महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीला मात्र राष्ट्रवादीचा गट सोडून भाजपकडूनच मोठा हातभार लागल्याची चर्चा आहे. भाजपची संघटनात्मक ताकद व कष्ट उपसण्याची कार्यकर्त्यांची जिज्ञासा राष्ट्रवादीला भरीव मदत करुन गेल्याची चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!