दुर्दैवी घटना ! लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या २ वृद्धांना कारने चिरडलं ; यवत जवळील भरतगावावर शोककळा
यवत : लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन वृद्ध मित्रांना चारचाकी गाडीने दिलेल्या धडकेत दोघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील भुलेश्वर फाटा येथे गुरुवारी (ता. २६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. शंकर खंडू जगदाळे ( वय -६८) व भगवान राजाराम टेमगिरे ( वय-६५) रा. दोघेही भरतगाव, ता. दौंड अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी शंकर जगदाळे आणि भगवान टेमगिरे हे दोघेजण दुचाकीवरून समृद्धी मंगल कार्यालय येथे विवाहासाठी निघाले होते. साडेतीन वाजण्याच्या सुमारास भुलेश्वर फाटा येथे नाईक बागेसमोर पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या चारचाकी गाडीने दुचाकीला जोरदार धडक देऊन फरफडत नेले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत संतोष बाळासाहेब जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारचालक राघू ताराचंद काळे ( मुळगाव काळे मळा, सोने सांगवी, निमगाव. ता. शिरूर,जि. पुणे) यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.