रांजणगावच्या एमआयडीसीत कॉन्ट्रॅक्टरने कामगारांना डांबून ठेवले! स्थानिक ठेकेदारावर गुन्हा दाखल..!!

शिरूर : शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावातील एका खोलीत कॉन्ट्रॅक्टरने कामगार डांबून ठेवले होते. डांबुन ठेवलेल्या सर्व कामगारांची सुटका रांजणगाव (ता. शिरूर) एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

मिलिंद लांडगे (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर सुनील दिगंबर वाघळकर (रा. सरदवाडी, शिरूर), भारत गजानन मोहे (रा. बोरगाव मंजू सध्या रा. सरदवाडी, शिरूर), स्वप्नील दादाभाऊ लगड, रा. ढोकसांगवी, शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील एसटीसी ही कंपनी आहे. या भागात अनेक कामगार परराज्यातून येत असतात. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कॉन्ट्रॅक्टरने डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तत्काळ पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी कामगारांना डांबून ठेवले आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली.

यावेळी काही कामगार हे खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या सर्व कामगारांची सुटका पोलिसांनी केली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर कॉन्ट्रॅक्टर हा कामगारांना अमानुषपणे मारहाण करत असे असे म्हटले आहे.

दरम्यान सरदवाडी गावात ज्या ठिकाणी खोलीत कामगार डांबून ठेवले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र नेमके किती कामगार होते याची आकडेवारी मात्र मिळू शकली नाही. या प्रकरणी पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.