Indapur : उद्या इंदापूरमध्ये रंगणार राजकीय फड! देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा, हर्षवर्धन पाटलांना कोणता शब्द देणार? कार्यकर्त्यांचे लागले लक्ष…

Indapur : देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपने बारामती लोकसभा निवडणुकीत लक्ष केंद्रित केले असून काहीही करून बारामती जिंकायची असा चंग भाजपने बांधला आहे.
यासाठी स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र काम करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे, याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, अजित पवार यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला, परंतु देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगितले आहे. आम्ही युतीचा धर्म पाळतो, पण महायुतीमधील घटक पक्षांनी देखील महायुतीचा धर्म पाळावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा संकल्प केला असून उद्या तीन वाजता इंदापूर येथे मेळावा होणार आहे, या मेळाव्यात फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालतील व समाधान करतील असा विश्वास आहे. उद्या फक्त भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
आम्हाला कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्या. चार वेळा आम्ही आणि कार्यकर्त्यानी आजपर्यंत ऐकले, मात्र प्रत्यक्षात सातत्याने अडचणी आणण्याचे काम झाले हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेत कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे स्वतः फडणवीस येथे येऊन कार्यकर्त्यांशी बोलतील.
काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांची मुंबई येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत समजूत काढली होती. यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी इंदापूरमध्ये सभा घेण्याचे ठरवले होते.
यामुळे उद्या याच पार्श्वभूमीवर सभा होणार आहे. इंदापूरमधील जुनी मार्केट कमिटी येथे दुपारी 3 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा असून इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांची ताकद आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यासह बारामती लोकसभा मतदार संघात आहे.
यामुळे त्यांची नाराजी कोणालाच परवडणारी नाही. या अगोदर झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी ज्यांचा प्रचार केला तेच बारामतीचे खासदार झाले आहेत. Indapur
लोकसभा निवडणुकीत मदत करून देखील विधानसभा निवडणुकीत दगाफटका होतो, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. आता उद्या देवेंद्र फडणवीस काय बोलणार यावर सगळे गणित अवलंबून आहे. यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.