Pune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; कोयते जप्त

पुणे : कात्रज येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून लोखंडी कोयते, मिरची पावडर, डोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कात्रज जवळ असलेल्या किनारा हॉटेलजवळील पेट्रोल पंपाजवळ ही शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १९, रा. नऱ्हे) याच्यासह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. बब्या पवार याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आणि जबरी मारहाण केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विक्रम दादासाहेब सावंत (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालीत होते. त्यावेळी खबऱ्यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आरोपी लपून बसलेले दिसले. पोलिसांनी छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी कोयते, मिरची पावडर, दोरी असे साहित्य जप्त केले आहे.

दरम्यान, पुढील तपास सहायक निरीक्षक विश्वास भाबड करीत आहेत.